रत्नागिरी
kashedi tunnel fire मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात ट्रकला अचानक आग लागल्याची मोठी घटना घडली. रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या बोगद्यात आगीमुळे धुराचे दाट लोट पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव बोगद्याच्या दोन्ही लेनमधील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

कशेडी बोगद्याची लांबी तब्बल अडीच किलोमीटर असून, बोगद्याच्या आत ट्रकने पेट घेतल्याने धुराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी, वाहनांची सुरक्षित ये-जा शक्य नसल्याने प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली. या घटनेमुळे गेल्या दोन तासांपासून बोगद्यातील वाहतूक ठप्प झाली होती.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली. आज रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक आणि प्रवासी कोकणाच्या दिशेने तसेच मुंबईकडे प्रवास करत आहेत. त्यामुळे जुन्या घाटमार्गावर वाहनांची गर्दी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, बोगद्याच्या परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ट्रकला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. बोगद्यातील आग आटोक्यात आली असली, तरी धुराचे प्रमाण आणि सुरक्षिततेची स्थिती लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत करण्याबाबत पुढील कार्यवाही केली जात आहे.