शेतकऱ्यांवर फ्लॅश दुष्काळाचे संकट!

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-flash-drought-studyदुष्काळ म्हटला की पावसाची दीर्घकाळ कमतरता आणि हळूहळू कोरडी पडणारी जमीन, असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आता काही आठवड्यांतच जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी करणाऱ्या ‘फ्लॅश दुष्काळा’चे आव्हान उभे राहिले आहे. भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या ४४ वर्षांच्या अभ्यासानुसार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली आणि सोलापूर या अर्ध-कोरड्या जिल्ह्यांत अचानक (फ्लॅश) दुष्काळ अधिक तीव्रतेने आणि वेगाने विकसित होत आहे.
 

drough 
संस्थेच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील विकास पूनिया आणि दीपिका यादव यांनी १९८१ ते २०२४ या कालावधीतील महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील पाऊस, तापमान, मातीतील ओलावा आणि बाष्पीभवनाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. हा अभ्यास ‘फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ द अर्थ’ या संशोधन नियतकालिकात अलिकडेच प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्राची ८३ टक्के जमीन अर्ध-कोरडी असून, राज्याच्या वार्षिक पावसापैकी ८८ टक्के पाऊस केवळ पावसाळ्याच्या चार महिन्यांत पडतो. बहुतेक शेती याच पावसावर अवलंबून आहे.
पावसाळ्यात मातीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे ‘फ्लॅश दुष्काळ’ कमी आढळतात. ४४ वर्षांत बहुतांश जिल्ह्यांत पावसाळ्यात अशा दोनपेक्षा कमी घटना नोंदल्या गेल्या. मात्र, पावसाळ्याव्यतिरिक्त काळात सरासरी २० घटना आढळल्या. सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अशा २५पेक्षा अधिक घटना नोंदल्या गेल्या.
पावसाची कमतरता हे ‘फ्लॅश दुष्काळा’मागील प्रमुख कारण आहे. मात्र, आधीच कोरड्या जमिनीवर उच्च तापमान आणि कोरडी हवा यांचा परिणाम झाल्यास दुष्काळाची तीव्रता झपाट्याने वाढते. सोलापूर परिसरात कमी पाऊस, उच्च तापमान आणि जमिनीतील कमी ओलावा या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम दिसून आला. फ्लॅश दुष्काळ विकसित होताना मातीतील ओलावा सुमारे १७ पर्सेंटाइल अंकांने कमी होतो. त्याचवेळी हवा अधिक उष्ण आणि कोरडी बनते. त्यामुळे वातावरण जमिनीतून आणि वनस्पतींमधून अधिक वेगाने पाणी खेचते.