नवी दिल्ली
Mann Ki Baat पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १४० व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांमधील वाढते अमली पदार्थांचे व्यसन, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल प्रशिक्षण, हरवलेले मोबाइल शोधण्यासाठी उपयुक्त असलेले ‘संचार साथी’ अॅप आणि देशातील संग्रहालयांचा ऐतिहासिक वारसा अशा विविध विषयांवर भाष्य केले. समाजातील प्रत्येक घटकाच्या कामगिरीला व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच सामाजिक आव्हानांबाबत जनजागृती करण्याचे काम ‘मन की बात’च्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या तरुणांच्या प्रतिभेची जगभरात चर्चा होत आहे. देशातील तरुण मोठी स्वप्ने पाहत असून ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. मात्र, त्यांच्या या स्वप्नांच्या पूर्ततेसमोर अमली पदार्थांचे व्यसन हे मोठे आव्हान बनत असल्याची चिंता मोदी यांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘मन की बात’मध्ये सर्वप्रथम त्यांनी नशेच्या व्यसनाचा विषय उपस्थित केला. देशात अमली पदार्थांविरोधात समाजाची सक्रियता वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘नशामुक्त युवा अभियान’ही वेगाने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनाधीनतेवर इच्छाशक्तीच्या जोरावर मात करणाऱ्या अनेक तरुणांची उदाहरणे समोर येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, स्वतःच्या व्यसनाविरुद्ध लढा देत अनेकांनी आयुष्याला नवी दिशा दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर पंतप्रधानांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविकासासाठी उपलब्ध असलेल्या ‘आयगॉट कर्मयोगी’ या डिजिटल व्यासपीठाची माहिती दिली. आयुष्यात नवे काही शिकण्याचा आनंद वेगळाच असतो आणि शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते, असे सांगत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांमधील शिकण्याच्या उत्साहाचे कौतुक केले. सरकारी सेवेत २० ते २५ वर्षांचा अनुभव असलेले अनेक कर्मचारी आपल्या नियमित जबाबदाऱ्या सांभाळतानाच नवे कौशल्य आत्मसात करण्यासाठी वेळ देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘आयगॉट कर्मयोगी’ या व्यासपीठावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी १७ भारतीय भाषांमध्ये सात हजारांहून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. लाखो कर्मचाऱ्यांनी या माध्यमातून विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. काही कर्मचारी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) प्रशिक्षण घेत आहेत, तर काही भारतीय सांकेतिक भाषा शिकत आहेत. विशेषतः एआय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शिक्षणाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याचे मोदी म्हणाले. या व्यासपीठावर एआय आणि नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित २०० हून अधिक अभ्यासक्रम असून, त्यांचे साडेतीन कोटींपेक्षा अधिक अभ्यासक्रम पूर्णत्वाचे टप्पे नोंदविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोबाइल फोन हरवल्यानंतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी केंद्र सरकारच्या ‘संचार साथी’ या डिजिटल व्यासपीठाचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाइलमध्ये संपर्क क्रमांक, छायाचित्रे, महत्त्वाची कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे फोन हरवल्यास मोठी अडचण निर्माण होते. मात्र, आता ‘संचार साथी’च्या मदतीने हरवलेला मोबाइल शोधण्याच्या प्रक्रियेत नागरिकांना मदत मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक मोबाइल फोनला स्वतंत्र ओळख देणारा आयएमईआय (IMEI) क्रमांक असतो. याच क्रमांकाच्या आधारे ‘संचार साथी’ व्यासपीठ हरवलेल्या मोबाइलचा शोध घेण्यास मदत करते. मोबाइल हरवल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासोबतच या व्यासपीठावर संबंधित फोनचा आयएमईआय क्रमांक आणि आवश्यक माहिती देऊन तो ब्लॉक करता येतो. त्यानंतर दुसरे सिमकार्ड टाकूनही त्या मोबाइलचा वापर करता येणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणाऱ्या संग्रहालयांकडेही नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले. नव्या ठिकाणी पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध स्थळे आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याबरोबरच स्थानिक संग्रहालयांनाही भेट द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. भारतीय संग्रहालयांबाबत अलीकडेच समोर आलेल्या काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक बातम्यांचा उल्लेख करताना त्यांनी बिहारमधील पाटणा येथील बिहार म्युझियमच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
जगातील १०० उत्कृष्ट संग्रहालयांच्या यादीत बिहार म्युझियमने नववे स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे, या यादीत संपूर्ण आशिया खंडात बिहार म्युझियम पहिल्या क्रमांकावर असल्याचे मोदी यांनी सांगितले. पॅरिसमधील प्रसिद्ध ‘लूव्र म्युझियम’ आणि न्यूयॉर्कमधील ‘द मेट’ या जगप्रसिद्ध संग्रहालयांचाही त्यांनी उल्लेख केला. या दोन्ही संग्रहालयांपेक्षा बिहार म्युझियमला या यादीत वरचे स्थान मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गुजरातमधील वडनगर येथे उभारण्यात आलेल्या ‘अनंत अनादि वडनगर आर्कियोलॉजिकल म्युझियम’चाही पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. वडनगरमध्ये पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात इतिहासाच्या विविध कालखंडांतील अनेक महत्त्वाच्या वस्तू आणि पुरावशेष सापडले आहेत. याच उत्खननस्थळी संग्रहालय विकसित करण्यात आले आहे. या संग्रहालयात जमिनीच्या अनेक मीटर खाली झालेल्या उत्खननाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, अशा पद्धतीने विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे. याशिवाय पाच हजारांहून अधिक प्राचीन कलाकृती येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
या संग्रहालयाच्या रचनात्मक आणि स्थापत्यविषयक वैशिष्ट्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. याच महिन्यात बर्लिन येथे आयोजित सोहळ्यात वडनगर संग्रहालयाला डिझाइन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘रेड डॉट : बेस्ट ऑफ द बेस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणारे भारतातील पहिले संग्रहालय ठरल्याचे मोदी यांनी सांगितले.
वडनगर हे हजारो वर्षांपासून सातत्याने वसलेले आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असल्याचे सांगताना त्यांनी त्याची तुलना काशीशी केली. वडनगरमध्ये आपला जन्म झाला असून काशीचे आपण खासदार आहोत, हा एक विशेष योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी कांची कामकोटी पीठाचे पूज्य शंकराचार्य यांनीही वडनगरला भेट दिली होती. त्यांनी वडनगरला ‘गुजरातची काशी’ अशी ओळख दिल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. या माध्यमातून देशाचा प्राचीन इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक संग्रहालय संकल्पना यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.