अनिल कांबळे
नागपूर,
hudkeshwar शहरातील कोणत्या भागात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे, कुठे पोलिसांची मदत वारंवार मागितली जाते आणि कोणत्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे, याचा शोध आता पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुरू केला आहे. शहरातील ३५ पोलिस ठाण्यांच्या कामगिरीचा आढावा घेताना जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत हुडकेश्वर परिसरात सर्वाधिक गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यांचे स्वरूप आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

गुन्ह्यांची संख्या हा आढाव्याचा एकमेव निकष नसून, नागरिकांनी मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला केलेले दूरध्वनी आणि त्यावर पोलिसांनी दिलेला प्रतिसाद यांचीही माहिती संकलित करण्यात आली आहे. कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे गुन्हे अधिक घडतात, त्यामागील कारणे काय आहेत आणि त्यावर कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात, याची स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे. गुन्हेगारीचे स्वरूप परिसरानुसार बदलत असल्याने सर्वच पोलिस ठाण्यांसाठी एकसारखी उपाययोजना करण्याऐवजी स्थानिक परिस्थितीनुसार रणनीती आखण्यावर भर दिला जाणार आहे. संवेदनशील भागांतील गस्त, प्रतिबंधात्मक कारवाई आणि पोलिसांच्या प्रतिसाद यंत्रणेचा प्रभावी वापर यांसारख्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
एमआयडीसी, कळमना, जरीपटका आघाडीवर
पोलिसांच्या आढाव्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कळमना येथे ३३३, जरीपटका येथे ३२६, गिट्टीखदान येथे ३२४ आणि यशोधरानगर येथे ३११ गुन्हे नोंदविण्यात आले. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २६२ गुन्हे घडले आहेत. दुसरीकडे, जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वांत कमी ७६ गुन्हे नोंदविण्यात आले. सोनेगावमध्ये ९०, शांतीनगरमध्ये ९३, भांडेवाडीमध्ये १०८, सक्करदरामध्ये १४६, तर कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६३ गुन्हे नोंदविण्यात आले.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करून उपाययोजनांची परिणामकारकता तपासण्यावर भर राहणार आहे.
विश्वास नांगरे पाटील (पोलिस आयुक्त)