नागपूर-गोंदिया ‘एक्सप्रेस वे’चा ५ टप्प्यांत विस्तार

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-gondia-expressway-projectपूर्व विदर्भातील रस्ते पायाभूत सुविधा व औद्योगिक वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या ‘नागपूर-गोंदिया ॲक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेस वे’ प्रकल्पाचा रोडमॅप तयार झाला आहे. ५ टप्प्यांमध्ये नागपूर-भंडारा-गोंदिया ‘एक्सप्रेस वे’चा विस्तार होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या या महत्त्वाकांक्षी कॉरिडॉरमुळे नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार असून, हा मार्ग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी
महामार्गाला थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे. यामुळे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे.‘एक्सप्रेस वे’ची सुरुवात नागपूर ग्रामीणमधील गवसी मानापूरपासून होईल, जो चनोडा, जांभळपाणी, मनोरा, सोनेगाव, तिरोडा, सावरी मार्गे गोंदिया बायपासपर्यंत पोहोचेल. या प्रकल्पाचे बांधकाम, निविदा व करार प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे.
 

express 
पॅकेज-१ व पॅकेज-२
पहिल्या पॅकेजमध्ये गवसी मानापूर ते चनोडापर्यंत २९.४० किमी लांबीचा सहा पदरी मार्ग बांधला जाणार आहे. याची अंदाजित किंमत २,६०० कोटी रुपये आहे. यात समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी, वाहन अंडरपास, ओव्हरपास व इंटरचेंजचा समावेश असेल. दुसऱ्या पॅकेजमध्ये चनोडा ते भंडारा शहरातील ठाणापर्यंत २९.४५ किमी रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. याची किंमत सुमारे ७७२ कोटी रुपये सांगितली जात आहे. बांधकाम व देखभालीच्या कराराला अंतिम रूप देण्यात आले आहे.
पॅकेज-३ व पॅकेज-४
ठाणा ते जांभळपाणी पर्यंतचा ३५.२५ किमी मार्ग तिसऱ्या पॅकेजमध्ये विकसित होईल. यात सहा पदरी व चार पदरी भाग, इंटरचेंज, पूल व अंडरपास बांधले जातील. चौथ्या पॅकेजमध्ये मनोरा ते तिरोडापर्यंत ३१.२६ किमी रस्त्याचे बांधकाम होईल. याची अंदाजित किंमत १,३८३ कोटी रुपये आहे. पालडोंगरी येथे इंटरचेंज व तिरोडा कनेक्टरही बांधला जाणार आहे.
पॅकेज-५ पासून गोंदिया बायपास
पाचव्या पॅकेजमध्ये सोनेगाव ते सावरी आणि लोहारी ते करंजापर्यंत सुमारे ३७ किमी रस्ता व बायपास विकसित होईल. रेल्वे ओव्हरब्रीज, पूल व अंडरपास बांधले जातील.
ताशी १२० किमी डिझाईन स्पीड
ताशी १२० किमी डिझाईन स्पीड, आधुनिक इंटरचेंज, अंडरपास, रेल्वे ओव्हरब्रीज, रेनवॉटर हार्वेस्टिंग, साऊंड बॅरियर व डिजिटल मॉनिटरिंगसारख्या सुविधांनी सुसज्ज हा ‘एक्सप्रेस वे’ केवळ जलद व सुरक्षित प्रवासाचे माध्यम ठरणार नाही, तर तिरोडा औद्योगिक क्षेत्र आणि गोंदिया शहराच्या बाह्य वाहतुकीलाही नवी गती देईल.
उल्लेखनीय म्हणजे, सुमारे ५५० किमीमध्ये विदर्भातील ४ मोठे ॲक्सेस कंट्रोल्ड ‘एक्सप्रेस वे’, ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे नेटवर्क टाकले जात आहे, जे एमएसआरडीसीच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहे. यातच नागपूर-भंडारा-गोंदिया ‘एक्सप्रेस वे’, नागपूर-चंद्रपूर ‘एक्सप्रेस वे’, भंडारा-गडचिरोली ‘एक्सप्रेस वे’ आणि नवेगाव मोड-कोसारी ते सूरजागड ग्रीनफिल्ड रोड, चंद्रपूर ते गडचिरोलीच्या सूरजागड, मांगेर क्षेत्रापर्यंत खनिज व औद्योगिक वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे.