अनिल कांबळे
नागपूर
nagpur school teacher यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मारहाण केली. त्यानंतर अन्य विद्यार्थिनीकडूनही मारण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरुन यशोधरानगर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, विनोबा भावे नगरात भाजीपाला विक्रेत्याची ७ वर्षीय मुलगी सुजल (काल्पनिक नाव) ही एका नामांकित शाळेत तिसऱ्या वर्गात शिकते. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. मात्र, सुजल ही शाळेच्या युनिफार्ममध्ये न गेल्यामुळे शिल्पा नावाच्या शिक्षिकेने तिला बाहेर बोलावले. सिव्हिल ड्रेसवर शाळेत का आली? असा प्रश्न विचारुन तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सुजलचा हात मुरगाळून पाठीमागे नेले. त्यात विद्यार्थिनीचा हात दुखावल्या गेल्याने सूज आली. त्यानंतर शिक्षिका शिल्पा यांनी एक अन्य विद्यार्थिनीलाही सुजलला मारण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. मारहाण आणि हातावर सूज आल्यामुळे सुजल रडत होती. त्यानंतर शिक्षिकेने कुणाच्यातरी माध्यमातून सुजलच्या आईला फोन करुन तिची प्रकृती बिघडल्याचे सांगून घरी नेण्यास सांगितले. विद्यार्थिनीच्या वडिलांनी मुलीला घरी नेले. मात्र, तिची प्रकृती आणखी बिघडली. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर रितसर वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल केला. कोणतीही टाळाटाळ केली नाही. प्रकरण आपसांत मिटवून घेण्याची तयारी तक्रारदार आणि मुख्याध्यापक यांची होती. आम्ही रितसर गुन्हा दाखल केला, अशी प्रतिक्रिया ठाणेदार युनूस शेख यांनी दिली.
शिक्षिकेवर गुन्हा दाखल
सुजलचे कुटूंब शाळेत गेले आणि शिक्षिकेला मुलीला केलेल्या मारहाणीबाबत जाब विचारला असता तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. तसेच शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली. त्यामुळे सुजलच्या पालकांनी थेट यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. शाळेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांची टाळाटाळ
शिक्षिकेविरुद्ध तक्रार द्यायला गेलेल्या पालकांची यशोधरानगर पोलिस तक्रार ऐकून घेण्यात येत नव्हती. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. ठाणेदार युनस शेखसुद्धा सहकार्य न करता आपसात प्रकरण मिटवून घेण्याची तंबी देत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. पोलिसांची असहकार्य बघता शेवटी पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यामुळे एनसी दाखल करण्यात आली.