नागपूर,
nagpur-women-leadership-conferenceआयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असण्यापेक्षा स्वतःवर विश्वास, कामाप्रती सातत्य आणि प्रामाणिक बांधिलकी असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित विजया-स्वयंसिद्धा राष्ट्रीय परिषदेत आयोजित चर्चासत्रात त्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होत्या. 'महिलांचे नेतृत्व, प्रशासन आणि सामाजिक परिवर्तन' हा या चर्चासत्राचा विषय होता. चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार निधी कामदार, महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. मनाली क्षीरसागर म्हणाल्या, कोणत्याही क्षेत्रात काम करताना दुसऱ्यांनी बदल घडवून आणण्याची अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतः त्या बदलाचा भाग बनले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे काम केल्यास अपेक्षित सामाजिक आणि संस्थात्मक परिवर्तन घडवून आणता येईल.
राजकारणाकडे करीअरचा पर्याय म्हणून पाहावे : निधी कामदार
आजच्या तरुणांनी राजकारणाकडे करीअरचा एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहावे. या क्षेत्रात सुशिक्षित आणि सक्षम तरुण आले, तरच अपेक्षित बदल घडू शकतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार निधी कामदार यांनी केले. गत काही वर्षांत एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांकडे तरुणांचा कल वाढला आहे. राजकारण हे बहुतांश तरुणांच्या करीअरच्या पहिल्या पसंतीत नसते. सरकारी सेवांमधील विविध संधी, फेलोशिप आणि इतर पर्यायांचा विचार केला जात असला, तरी राजकीय क्षेत्रात करीअर करण्याबाबत तरुणांमध्ये पुरेशी उत्सुकता दिसत नाही.
मात्र, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सर्वाधिक बदल घडवून आणण्याची क्षमता राजकीय क्षेत्रात आहे. आपल्या जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय राजकीय व्यवस्थेत घेतले जातात. त्यामुळे या क्षेत्रापासून दूर न राहता तरुणांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सकारात्मक बदलासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा-शिवानी दाणी
स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महिलांचा अधिकाधिक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांनी केले. महिलांना घर चालवण्याचे वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज नसते. कारण त्या स्वतः घराची जबाबदारी सांभाळत असतात. घरातील प्रमुख समस्या, आवश्यक सुविधांची कमतरता आणि सुधारणांची गरज यांची त्यांना चांगली जाणीव असते. हाच अनुभव स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्व करताना उपयुक्त ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. महिला केवळ आरक्षणामुळे निवडणूक लढवतात असे नाही.
समाजातील निम्मी लोकसंख्या महिलांची असल्याने निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग असणेही तितकेच आवश्यक आहे. महिला नेतृत्वामुळे स्थानिक प्रश्नांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांच्या निराकरणासाठीही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. या चर्चासत्राचे समन्वयन डॉ. रिता वडेतवार आणि डॉ. माधवी मार्डीकर यांनी केले.