मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून भारतीय चॉकलेट उद्योगाचे कौतुक

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासीयांशी संवाद साधताना ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १४० व्या भागात भारतीय चॉकलेट उद्योगाचे विशेष कौतुक केले. भारतात तयार होणाऱ्या चॉकलेटला जागतिक स्तरावर मिळणारी ओळख, या क्षेत्रातील वाढते नावीन्य आणि स्थानिक उद्योजकांचे प्रयत्न यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विशेषतः गुजरातमधील सुरत येथील ‘श्मिटेन’ (Schmitten) या चॉकलेट ब्रँडचे कौतुक करताना, ‘मेड इन इंडिया’ फाइन चॉकलेट ब्रँड म्हणून हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.



भारतात चॉकलेट संस्कृतीचे स्वरूपही बदलत असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदविले. देशात आकर्षक आणि आधुनिक चॉकलेट बुटीकची नवी संकल्पना विकसित होत आहे. या ठिकाणी ग्राहकांना केवळ चॉकलेटचा आस्वादच मिळत नाही, तर भारतीय संस्कृतीची झलक असलेला एक वेगळा आणि आलिशान अनुभवही घेता येतो, असे त्यांनी नमूद केले.

चॉकलेट निर्मितीच्या क्षेत्रात देशाच्या विविध भागांतील उद्योजक नवनवीन संकल्पना घेऊन पुढे येत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. या उद्योगात अनेक स्टार्टअप्स नावीन्यपूर्ण प्रयोगांना चालना देत आहेत. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करून वेगवेगळ्या चवींची चॉकलेट तयार केली जात आहेत. अशा प्रयोगांमुळे चॉकलेट उद्योगाला नवी दिशा मिळण्याबरोबरच शेतकरी, महिला आणि तरुण उद्योजकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गुजरातमधील कच्छ प्रदेश आणि चॉकलेट उद्योग यांच्यातील विशेष संबंधांचाही मोदी यांनी उल्लेख केला. विशेषतः उंटिणीच्या दुधापासून तयार होणाऱ्या चॉकलेटचा प्रयोग त्यांनी अधोरेखित केला. अमूलकडून स्थानिक उंटपालकांकडून दूध संकलित करून त्याचा वापर विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. या दुधापासून चॉकलेट, केशरयुक्त दूध तसेच ‘राजभोग’ आइस्क्रीम यांसारखी उत्पादने तयार केली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.स्थानिक संसाधने, पारंपरिक उत्पादन पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून भारतीय उद्योजक जागतिक बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत. चॉकलेट उद्योगातील हे प्रयोग केवळ उत्पादनापुरते मर्यादित नसून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आणि शेतकरी, महिला व युवा उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध करून देणारे ठरत असल्याचेही पंतप्रधानांच्या संवादातून अधोरेखित झाले.