धक्कादायक...शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत तीन बॉम्ब

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
Prayagraj School Bomb Incident 
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याच्या बॅगेत तीन गावठी बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. शाळेतील नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत स्फोटके आढळल्याने शाळा परिसरात घबराट पसरली. प्राथमिक चौकशीत संबंधित विद्यार्थ्याने हे तिन्ही बॉम्ब आपणच तयार केल्याचे सांगितले. वर्गातील एका सहाध्यायाशी झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.



ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. शाळेत नियमित सुरक्षेचा भाग म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करत होते. यावेळी आठवीच्या एका विद्यार्थ्याच्या बॅगेत तीन गावठी बॉम्ब आढळले. शिक्षकांनी तातडीने शाळा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. प्रशासनाने विद्यार्थ्याची चौकशी केली असता, त्याने हे बॉम्ब स्वतः तयार केल्याचे कथितरीत्या सांगितले.

सहाध्यायासोबत झालेल्या वादातून त्याने बॉम्ब बनविल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबंधित विद्यार्थ्याला घाबरविण्याच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या स्फोटकांचा वापर करून कोणाला इजा करण्याचा त्याचा हेतू होता का, यासह इतर सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. शाळेच्या उपप्राचार्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विद्यार्थ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त सागर जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याला स्फोटक साहित्य कुठून मिळाले आणि स्फोटक उपकरणे तयार करण्याचे तंत्र त्याने कुठून शिकले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, की विद्यार्थ्याने हे कृत्य स्वतःच केले, याचाही शोध घेतला जात आहे. सक्षम अधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर विद्यार्थ्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. संबंधित विद्यार्थी अल्पवयीन असल्याने किशोर न्याय कायद्यातील तरतुदींनुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षा व्यवस्था आणि अल्पवयीन मुलांपर्यंत स्फोटक साहित्य पोहोचण्याच्या शक्यतेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.