पुतिनही झाले १६ वर्षीय भारतीय एआय प्रतिभावंताचे चाहते!

मॉस्कोत पुतिन यांच्याशी एआयवर चर्चा करत भारतीय तरुणाने घेतला सेल्फी

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
putin-meets-indian-ai-prodigyमॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचा १६ वर्षीय कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिभावंत राऊल जॉन अजू यांच्यातील संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गंभीर जागतिक आणि तंत्रज्ञानाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना एका किशोरवयीन विद्यार्थ्याने दिलेले हजरजबाबी उत्तर आणि त्यानंतर घेतलेला सेल्फी यामुळे हा प्रसंग अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
 

ai charcha 
संवादादरम्यान राऊलने शिक्षणातील एआयच्या भूमिकेवर आपली मांडणी केली. गणिताच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी तो गेम खेळत असल्यासारखा वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो मजेशीर आणि स्वतःच्या सोयीच्या पद्धतीने अभ्यास करत होता, असा अनुभव त्याने सांगितला. "मी माझ्या वैयक्तिक पद्धतीने शिकू शकलो; पण ४० विद्यार्थ्यांच्या वर्गात एका शिक्षकासाठी प्रत्येकापुरते शिक्षण वैयक्तिक पातळीवर नेणे कसे शक्य आहे? तिथेच एआय मदत करू शकते," असे त्याने ठामपणे मांडले. चित्र, व्हिडिओ किंवा खेळांच्या माध्यमातून गणित शिकता आले तर काय होईल, असा विचारही त्याने पुढे केला.
 
राऊलच्या या युक्तिवादावर पुतिन यांनी एआयवरील वाढत्या अवलंबित्वाबाबत महत्त्वाची शंका उपस्थित केली. विचार करण्याऐवजी फक्त लक्षात ठेवणे किंवा मशीनने दिलेले उत्तर जसेच्या तसे वापरण्याची सवय तरुणांमध्ये वाढण्याचा धोका त्यांनी बोलून दाखवला. "एखादा तरुण संगणकासमोर बसतो आणि विचार न करता केवळ काहीतरी लिहिण्यासाठी किंवा मशीन जे देते ते तयार करण्यासाठी एआयचा वापर करतो; अगदी एजंटलाही काहीतरी देतो आणि ते पुरेसे मानतो," असे पुतिन यांनी स्पष्ट केले. मात्र, शैक्षणिक प्रक्रियेत एआय वापरताना असा कोणताही धोका नाही, असा मुद्दाही त्यांनी या संवादात नोंदवला.