स्टॅलिन यांची भूमिका कायम

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
चेन्नई
rahul-gandhi
प्रस्तावित परिसीमन विधेयकावरून इंडिया आघाडीतील मतभेद समोर आले असून, द्रमुकचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भूमिका बदलण्यात काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांना यश आलेले नाही. इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी रविवारी चेन्नई येथे स्टॅलिन यांची भेट घेऊन या विधेयकासंदर्भात चर्चा केली. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी आपली बाजू मांडूनही स्टॅलिन यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे त्यांचे मन वळविण्याचे विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरले.



स्टॅलिन यांनी यापूर्वीच परिसीमन विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यांच्या या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी तसेच त्यांना आपली भूमिका बदलण्याची विनंती करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या भेटीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीतील चर्चेची माहिती दिली. स्टॅलिन यांच्याशी अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचे सांगतानाच, आपण त्यांच्यासमोर विरोधकांची भूमिका स्पष्ट केल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले.

प्रस्तावित परिसीमन प्रक्रियेतून लोकसभेच्या एकूण जागांची संख्या ८५० पर्यंत वाढविण्याचा आणि या जागांचे स्वरूप निश्चित करण्याची मुभा भाजपला मिळण्याचा धोका असल्याचे राहुल गांधी म्हणाले. अशा निर्णयामुळे देशातील निवडणूक मतदारसंघांची संपूर्ण रचना बदलू शकते. याचा परिणाम केवळ संपूर्ण भारतावरच नव्हे, तर विशेषतः दक्षिण भारत आणि तमिळनाडूवर प्रतिकूल होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. तमिळनाडूचे खंबीरपणे संरक्षण करणारे नेते म्हणून स्टॅलिन यांनी या संभाव्य धोक्याविरोधात उभे राहावे आणि भाजपचा कथित डाव यशस्वी होऊ देऊ नये, असे आवाहन आपण त्यांना केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

या विधेयकामुळे तमिळ संस्कृती, तमिळ भाषा आणि तमिळ जनतेच्या हिताला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. हा केवळ तमिळनाडूचा प्रश्न नसून भारतीय संघराज्य व्यवस्था आणि संपूर्ण देशाच्या हिताशी संबंधित विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील लोकशाही टिकविण्यासाठी देशभक्त नागरिकांनी या संभाव्य धोक्याविरोधात आवाज उठविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

बैठकीत द्रमुकने नेमकी कोणती भूमिका मांडली किंवा काय भूमिका घेतली, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. आपण केवळ स्टॅलिन यांच्याशी झालेल्या चर्चेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मांडलेली भूमिका सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टीका केली. आरएसएस ही तमिळविरोधी शक्ती असून, तमिळ सभ्यतेच्या संकल्पनेला तिचा विरोध असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

भाजपने परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघांची फेररचना करून सभागृहातील जागा ८५० पर्यंत नेल्यास भारतीय लोकशाहीसमोर गंभीर संकट उभे राहील. त्यानंतर तमिळ संस्कृती आणि तमिळ भाषेवर व्यापक स्वरूपात आघात होण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. 'माझे हे शब्द लक्षात ठेवा,' असे म्हणत राहुल गांधी यांनी या मुद्द्याचे गांभीर्य अधोरेखित केले.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करूनही एम. के. स्टॅलिन यांनी परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. त्यामुळे या विधेयकावरून विरोधी आघाडीत असलेले मतभेद अधिक ठळक झाले आहेत.