नाशिक,
run-maharashtra-nashik-marathonफिटनेससोबतच सामाजिक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या ‘रन महाराष्ट्र’ या उपक्रमाचा नाशिकमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. जलसंवर्धन आणि पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या मॅरेथॉनमध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पहाटे ५ वाजता ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लब ग्राउंड येथून या धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली.
या उपक्रमात शहरातील शेकडो नागरिक, तरुण, फिटनेसप्रेमींसह भारतीय सैन्य दलातील जवानही सहभागी झाले होते. धावण्याच्या माध्यमातून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जवानांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सर्व वयोगटांतील धावपटूंना सहभागी होता यावे, यासाठी स्पर्धेचे चार गट करण्यात आले होते. यामध्ये १० किलोमीटर टाइम्ड रन, ५ किलोमीटर टाइम्ड रन, ५ किलोमीटर फन रन आणि २ किलोमीटर फन रन यांचा समावेश होता. फिटनेसची आवड जोपासताना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम नाशिकमध्ये लक्षवेधी ठरला. जलसंवर्धनाचा संदेश घेऊन धावलेल्या नाशिककरांनी ‘रन महाराष्ट्र’च्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा दुहेरी संदेश दिला.