रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करा

जि.प. सदस्य वंदना काळे यांची प्रशासनाकडे मागणी

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
मुल्ला,
salekasa-farmers-water-crisisअवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील धानपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त घोषित होऊनही अनेक शेतकरी पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीसह नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. या पृष्ठभूमीवर रबी हंगामातील पिकांना पुरेसे सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस नियोजन करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य वंदना काळे यांनी केली आहे.
 

water crisis 
जलाशय, नद्या, नाले, तलाव आणि विहिरींमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे पुनर्मूल्यांकन करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्राधान्याने पाणी द्यावे. कालवे व नहरांद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तसेच बंधारे व तलावांमधील पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. पावसाची आकडेवारी, पिकांची स्थिती, जलाशयांमधील पाणीसाठा आणि भूजल पातळीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून पाणी नियोजनाचा फेरआढावा घ्यावा. यासाठी जलसंपदा व कृषी विभागाने समन्वयाने काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
शेतकर्यांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या शेतापर्यंत प्रत्यक्ष पाणी पोहोचविण्यासाठी पालकमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नामदेव किरसान, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी. बैठकीत सिंचनाचे ठोस नियोजन निश्चित करून निर्णयांची लेखी माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. रबी हंगामात पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये आणि शेतकर्यांचे आर्थिक नुकसान टाळता यावे, यासाठी प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.