बेंगळुरू,
vande bharat food देशातील प्रीमियम आणि वेगवान रेल्वे सेवांमध्ये गणल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेंगळुरूहून बेळगावीकडे प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला नाश्त्यासाठी देण्यात आलेल्या वड्यामध्ये चक्क लोखंडी बोल्ट आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने संबंधित खाद्यपदार्थाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) संबंधित सेवा पुरवठादाराविरोधात दंडात्मक कारवाई केल्याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ कोडियाल हे बेंगळुरूहून बेळगावीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना नाश्त्यासोबत वड्याचे वाटप करण्यात आले. मात्र, वड्यामध्ये मोठ्या आकाराचा धातूचा बोल्ट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खाद्यपदार्थात अशा प्रकारची वस्तू आढळल्याने त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने या प्रकाराचे फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तसेच रेल्वे प्रशासन आणि IRCTC कडे तक्रार नोंदवली. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या तक्रारीनंतर IRCTC ने प्रवाशाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित खाद्यसेवा पुरवठादारावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, संबंधित किचन युनिटमधील कर्मचाऱ्यांना निर्धारित मानक कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाद्यपदार्थ तयार करण्यापूर्वी स्वयंपाकघरातील सर्व उपकरणांची तपासणी करणे आणि संपूर्ण किचन युनिटची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न तयार करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, वंदे भारतसारख्या प्रीमियम रेल्वे सेवेत खाद्यपदार्थांमध्ये लोखंडी बोल्ट आढळल्याने प्रवाशांच्या अन्नगुणवत्तेबाबतच्या अपेक्षा आणि रेल्वेच्या खानपान व्यवस्थेतील तपासणी प्रक्रियेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.