विशाळगडावर २५ किलो मांस नेण्याचा प्रयत्न

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
पुणे
Vishalgad Controversy
महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा समृद्ध आणि गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी शासनासह विविध संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली जाते. तसेच पर्यटकांमध्ये ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जातो. गड-किल्ल्यांना भेट देताना पर्यटकांनी तेथील इतिहास जाणून घ्यावा, आपल्या वैभवशाली परंपरेची माहिती घ्यावी, असे आवाहन सातत्याने केले जाते. मात्र, काही ठिकाणी या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग करणारे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. किल्ल्यांवर पार्ट्या करणे, गोंधळ घालणे तसेच महिलांची छेडछाड करण्याच्या घटनांनंतर आता विशाळगडावरील एका कथित प्रकाराने खळबळ उडाली आहे. विशाळगडावर तब्बल २५ किलो मांस घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवभक्तांनी केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विशाळगडावर मांसाहार शिजवण्यास बंदी असल्याचे सांगितले जाते. असे असतानाही २५ किलोपेक्षा अधिक मांस गडावर नेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार शिवभक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला पकडून मारहाण केल्याचे वृत्त आहे. पोलिस प्रशासनाच्या नजरेतून हा प्रकार टाळून मांस गडावर नेले जात असल्याचा आरोपही शिवभक्तांनी केला आहे. याशिवाय, विशाळगडावर राहणाऱ्या काही नागरिकांकडून सर्रास मांस शिजवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवभक्तांनी पकडलेले मांस पोलिसांनी दरीत फेकून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


या कथित घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मांस विशाळगडावर का नेले जात होते? गडावर मांस शिजवले जात असल्याच्या आरोपांची प्रशासन दखल घेणार का? असे प्रकार उघडपणे घडत असतील, तर संबंधित भागातील प्रशासन आणि पोलिस यंत्रणा नेमकी काय करत आहे? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.