संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली

शाळा, ग्रामपंचायती आणि गावपातळीवर व्यापक जनजागृती

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
वाशीम,
save water जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यात पाणी बचतीची व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
 

save water 
 
 
शाळांमधील विद्यार्थ्यांपासून गावपातळीवरील नागरिकांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच ‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ अभियान आणि ‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीवरही भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील निवडक शाळांना सल्लागार प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करीत आहेत. किमान २० मिनिटांच्या सादरीकरणातून किंवा व्हिडिओ रीलच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व आणि पाणी बचतीच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. गावागावांत पाणी बचत आणि घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ विषयी जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांचा उपयोग केला जात आहे.save water जिल्हास्तरावर तयार केलेल्या ऑडिओ लिप्स घंटागाड्यांवरून प्रसारित करून नागरिकांपर्यंत पाणी बचत व स्वच्छतेचे संदेश पोहोचविले जात आहेत.
१९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावपातळीवर विविध उपक्रम राबवून स्वच्छतेच्या सवयी आणि शौचालयांच्या नियमित वापराबाबत जनजागृती केली जात आहे. ‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’विषयी मे २०२६ पासून जनजागृती मोहीम सुरू आहे. या अंतर्गत कुटुंबस्तरावर कचर्‍याचे चार प्रकारांत विलगीकरण केले जात आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या व्हिजिट बुकमध्ये नोंदी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार असल्याचे स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे यांनी सांगितले.