नवी दिल्ली,
atm rbi rule एटीएममधून वारंवार पैसे काढणे किंवा खात्यातील शिल्लक तपासणे आता ग्राहकांना महागात पडू शकते. मात्र, अतिरिक्त शुल्क आकारले जाण्यापूर्वी ग्राहकांना त्याची माहिती मिळावी, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्देशानुसार, मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर बँकांना ग्राहकांना अलर्ट देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनावश्यक एटीएम व्यवहार टाळून ग्राहकांना अतिरिक्त शुल्कापासून बचाव करता येणार आहे.

आरबीआयने २७ नोव्हेंबर रोजी एटीएम आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनलच्या माध्यमातून होणाऱ्या रोख व्यवहारांसंदर्भात सुधारित निर्देश जारी केले. हे निर्देश तातडीने लागू करण्यात आले असून, २००८ ते २०२२ या कालावधीत जारी करण्यात आलेली १७ जुनी परिपत्रके एकत्रित करण्यात आली आहेत. सध्या ग्राहकांना दरमहा ठरावीक मर्यादेपर्यंत एटीएम व्यवहार मोफत करता येतात. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी बँकांना जास्तीत जास्त २३ रुपये शुल्क आकारता येईल. त्यावर १८ टक्के जीएसटी लागू झाल्यास एका व्यवहारासाठी ग्राहकांना २७.१४ रुपये मोजावे लागू शकतात. अशा प्रकारे दरमहा पाच अतिरिक्त शुल्क आकारले जाणारे व्यवहार केल्यास वर्षभरात १ हजार ६२८ रुपये ४० पैसे खर्च होऊ शकतात. तर दहा अतिरिक्त व्यवहार केल्यास हा खर्च ३ हजार २५६ रुपये ८० पैशांपर्यंत पोहोचू शकतो.
नव्या नियमामुळे ग्राहकांना व्यवहारांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. बँकांना ग्राहकांनी किती मोफत व्यवहार केले आहेत आणि त्यानंतरच्या व्यवहारांसाठी किती शुल्क आकारले जाणार आहे, याची स्पष्ट माहिती देणारी व्यवस्था करावी लागेल. तसेच तांत्रिक अडचणी, एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसणे, चुकीचा पिन किंवा बँकेशी संबंधित कारणांमुळे अयशस्वी झालेल्या व्यवहारांवर शुल्क आकारता येणार नाही. असे व्यवहार मोफत व्यवहारांच्या मर्यादेतही मोजले जाणार नाहीत.atm rbi rule ग्राहकांना एटीएम वापराची मर्यादा आणि लागू शुल्क यांची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएम खर्च कमी करण्यासाठी ग्राहकांनी शक्यतो स्वतःच्या बँकेच्या एटीएमचा वापर करावा, गरजेनुसार रोख रक्कम काढावी आणि शिल्लक तपासण्यासाठी मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडावा. पात्र व्यापाऱ्यांच्या पीओएस टर्मिनलवरून एका व्यवहारात २ हजार रुपयांपर्यंत आणि महिन्याला एकूण १० हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या सुविधेसाठी शुल्क आकारल्यास ते काढलेल्या रकमेच्या एक टक्क्यापेक्षा अधिक असू शकणार नाही.