चंद्रपूर,
brutally murdered येथील लुम्बिनी नगर परिसरात 8 जणांच्या सशस्त्र टोळक्याने एका तरुणाची तलवार आणि रॉडने सपासप वार करून हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. पृथ्वी माहूरकर (20, रा. बाबुपेठ, चंद्रपूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा गँगवारचा प्रकार झाला असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पृथ्वी माहूरकर हा आपल्या पाच मित्रांसोबत लुम्बिनी नगर भागात गेला होता. त्यावेळी परिसरात आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पृथ्वी आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी पृथ्वीने एका घराच्या दिशेने धाव घेत आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारेकर्यांनी त्याला गाठले आणि त्या घराच्या अंगणातच त्याच्यावर रॉड व तलवारीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात पृथ्वी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच गतप्राण झाला. त्यानंतर मारेकर्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी व पंचनामा केला. रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या खळबळजनक हत्येमागे जुन्या वादाची किनार असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ज्या ठिकाणी वादाला तोंड फुटले, त्या परिसरात अवैध दारूचा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय हल्लेखोर हे अवैध दारू आणि गांजा तस्करीशी संबंधित व्यावसायिक असल्याची चर्चा असून, या भागात दारूसोबतच गांजाचीही बेकायदेशीर विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. अवैध धंद्यांच्या विळख्यातून उफाळणार्या वादांचे रूपांतर थेट रक्तरंजित हत्याकांडात होत असल्याने, शहरातील अवैध दारू व अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.