नागपूर,
45 rupees wheat pikala insurance protection रब्बी हंगामातील पिकांना हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू झाली असून, गहू आणि हरभरा या प्रमुख पिकांचा यात समावेश करण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
विमा संरक्षण रक्कम आणि भरवावयाचा हप्ता
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गहू पिकासाठी प्रतिहेक्टर 45,000 रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली असून, शेतकऱ्यांना केवळ 45 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. तर हरभरा पिकासाठी प्रतिहेक्टर 36,000 रुपये विमा संरक्षण मिळणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचा हिस्सा 360 रुपये इतका आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्राची अट असून, कर्जदार आणि बिगरकर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे.
डिजिटल पीक पाहणीतील नोंद असणार अत्यंत महत्त्वाची
नुकसानीच्या वेळी योग्य भरपाई मिळण्यासाठी ‘डिजिटल पीक पाहणी’ (DCS) अंतर्गत पिकाची अचूक नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्याने पीक विम्याच्या अर्जात दिलेली पिकाची माहिती आणि डिजिटल सर्वेक्षणातील नोंद यामध्ये काही तफावत आढळल्यास, डिजिटल पीक पाहणीतील नोंदच अंतिम मानली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद डिजिटल ॲपवर अचूक करावी, असा सल्ला कृषी प्रशासनाने दिला आहे.
कुळाने शेती करणाऱ्यांनाही योजनेचा मिळणार लाभ
या योजनेची व्याप्ती वाढवत मक्त्याने किंवा कुळाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही यामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका किंवा मंडळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे.