वनडे मालिकेआधी न्यूझीलंडला हादरा

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
new-zealand-ahead-of-the-odi-series भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या सामन्याच्या तोंडावर संघाचा अनुभवी फलंदाज डेव्हन कॉनवे दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. सरावादरम्यान झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीही जखमी झाला आहे.
 
new-zealand-ahead-of-the-odi-series
 
मंगळवारी सराव सत्र सुरू असताना झेल पकडण्याच्या प्रयत्नात कॉनवे आणि हेन्री यांची एकमेकांशी जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांनाही दुखापत झाल्याने तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. कॉनवेच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याला रुग्णालयात हलवण्यात आले असून, पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, हेन्रीलाही दुखापत झाली असली तरी तो सामना खेळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे.
 
दरम्यान, मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला खेळाडूंच्या अनुपलब्धतेचा सामना करावा लागत आहे. याआधी रचिन रवींद्र आणि मार्क चॅपमन यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यांच्याशिवाय जॅक फॉल्क्स, विल ओ'रूर्क आणि बेन सीअर्स हे खेळाडूही मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडला संघाची नव्याने जुळवाजुळव करावी लागत आहे.
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी तयारी सुरू केली असून, भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत दुखापतींच्या संकटातून बाहेर पडत न्यूझीलंडचा संघ मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.