खैबर पख्तूनख्वा,
Attack on a polio team in Pakistan पाकिस्तानमध्ये पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या मोहम्मंद जिल्ह्यात मंगळवारी मोटारसायकलवरून आलेल्या संशयित हल्लेखोरांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून, अन्य एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. संबंधित पोलीस कर्मचारी घराघरांत जाऊन मुलांना पोलिओची लस देणाऱ्या आरोग्य पथकांना सुरक्षा पुरविण्यासाठी जवळच्या गावाकडे जात होते. पोलीस अधिकारी अयाज खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण मोहिमेला कट्टरतावादी संघटनांकडून सातत्याने विरोध केला जात आहे. पाकिस्तानी तालिबानसह काही दहशतवादी संघटना लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना लक्ष्य करतात. पाश्चिमात्य देश मुस्लिम मुलांना नपुंसक बनविण्यासाठी लसीकरणाचा वापर करत असल्याचा खोटा प्रचार या संघटनांकडून केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण पथकांना विरोधाचा सामना करावा लागतो. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत तो असहनीय असल्याचे म्हटले आहे. देशाचे भविष्य निरोगी राहावे यासाठी हे पोलीस कर्मचारी काम करत होते, असे सांगत त्यांनी मृत पोलिसांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
दरम्यान, पाकिस्तानने पोलिओ निर्मूलनाच्या उद्देशाने सोमवारी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत २.४ कोटी मुलांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि शेजारील अफगाणिस्तान हे जगातील असे दोनच देश आहेत, जिथे पोलिओ विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये पोलिओविरोधातील लढा सुरू आहे. मात्र, लसीकरण मोहिमेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या वर्षीही खैबर पख्तूनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पोलिओ लसीकरण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. लसीकरणाबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि आरोग्य पथकांवरील हल्ले यामुळे पाकिस्तानसमोरील पोलिओ निर्मूलनाचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे.