clean-your-light-bulbs-and-tubelights दिवाळीचा सण जवळ येताच घराच्या स्वच्छतेची लगबग सुरू होते. घरातील फरशी, खिडक्या, दरवाजे, पंखे आणि स्वयंपाकघराची साफसफाई केली जाते. मात्र, घराला प्रकाश देणारे बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. कालांतराने त्यांच्यावर धूळ, तेल आणि चिकट घाण जमा होते. त्यामुळे दिव्यांचा प्रकाश मंदावल्यासारखा दिसतो. अशा वेळी काही सोप्या उपायांनी बल्ब आणि ट्यूबलाइट स्वच्छ करून त्यांची चमक पुन्हा वाढवता येते.
विशेषतः स्वयंपाकघरातील दिव्यांवर तेलकट थर जमा होण्याचे प्रमाण अधिक असते. ही घाण काढण्यासाठी साफसफाई करताना योग्य पद्धत वापरणे आवश्यक आहे. सर्वात आधी दिव्यांचा स्विच बंद करावा. शक्य असल्यास मुख्य वीजपुरवठाही खंडित करावा. बल्ब किंवा ट्यूबलाइट फिटिंगमधून काढल्यानंतर लगेच स्वच्छ करू नये. बराच वेळ सुरू असल्यामुळे ते गरम झालेले असतात. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच स्वच्छतेला सुरुवात करावी.
सुरुवातीला कोरड्या आणि स्वच्छ मायक्रोफायबर किंवा सुती कापडाने बल्ब आणि ट्यूबलाइटवरील धूळ पुसून घ्यावी. यामुळे वरवर साचलेली धूळ सहज निघून जाते. मात्र, तेलकट डाग आणि चिकट घाण काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा उपयोग करता येतो. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा दोन कप पाण्यात मिसळावा. या मिश्रणात कापड हलके ओले करून चांगले पिळून घ्यावे. त्यानंतर त्या कापडाने बल्ब किंवा ट्यूबलाइट सावकाश पुसावी. कोणतेही द्रावण थेट दिव्यावर टाकू नये आणि कापडातून पाणी गळणार नाही याची काळजी घ्यावी.
जास्त प्रमाणात तेलकटपणा आणि ग्रीस जमा झाले असल्यास बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करण्याची पद्धतही सांगितली जाते. या दोन्ही पदार्थांची पेस्ट तयार करून ती कापडाच्या मदतीने घाणीच्या भागावर लावता येते. काही वेळानंतर स्वच्छ कापडाने तो भाग पुसून घ्यावा. मात्र, विद्युत उपकरणांवर पेस्ट किंवा द्रवपदार्थ थेट लावणे टाळावे.
याशिवाय साबण किंवा डिटर्जंटच्या सौम्य द्रावणाचाही वापर करता येतो. यामुळे साचलेली धूळ आणि तेलकट डाग काढण्यास मदत होते. जुन्या बल्ब, ट्यूबलाइट आणि सीएफएलवरील घाण साफ करण्यासाठीही ही पद्धत उपयोगी ठरू शकते. दिवाळीच्या साफसफाईत घरातील दिव्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, स्वच्छतेच्या नादात विद्युत उपकरणांमध्ये पाणी जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी. बल्ब आणि ट्यूबलाइट पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच त्यांचा पुन्हा वापर करावा. योग्य काळजी घेतल्यास घरातील दिव्यांची स्वच्छता राखता येईल आणि घर अधिक उजळ दिसण्यास मदत होईल.