ग्लेन मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
पर्थ,
Glenn Maxwell's retirement ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, क्रिकेटला अलविदा करताना त्याच्या मनात एक खंत कायम राहिली आहे. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) खेळण्याची मॅक्सवेलची इच्छा होती. मात्र, ही संधी न मिळाल्याने त्याला निवृत्तीच्या निर्णयासोबतच या अपूर्ण इच्छेचीही सल राहणार आहे. 'द फायनल वर्ड' या पॉडकास्टवर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
 
 
Glenn Maxwell
 
निवृत्तीच्या निर्णयासाठी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाकडून कोणताही दबाव नव्हता, असे मॅक्सवेलने स्पष्ट केले. मात्र, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर निरोपाचा सामना खेळण्याची शक्यता असल्याची चर्चा होती, असे त्याने सांगितले. संघ व्यवस्थापन आगामी काळात कोणत्या दिशेने वाटचाल करू इच्छित आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचेही त्याने नमूद केले. २०२८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने पुढील १२ ते २४ महिन्यांत ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. केवळ बिग बॅश लीगमध्ये खेळून हा अनुभव मिळू शकत नाही, याची जाणीव एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आपल्याला असल्याचे मॅक्सवेलने सांगितले.
 
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी मॅक्सवेल टी-२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॅश लीगच्या २०२६-२७ हंगामात तो मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या एकूण टी-२० कारकिर्दीत मॅक्सवेलने ११,३६९ धावा केल्या असून गोलंदाज म्हणून २१४ बळीही मिळवले आहेत. क्रिकेटला दिलेली अनेक वर्षे आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध लक्षात घेता निवृत्तीचा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता. आपल्या सहकारी खेळाडूंना हा निर्णय सांगणे अपेक्षेपेक्षा अधिक कठीण ठरल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.