गोंदिया,
gondia-city-police-action शहरातील फ्लिपकार्ट कुरिअर हबमधून चोरीस गेलेला तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोधून हस्तगत केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीस गेलेले एसीचे आऊटडोअर युनिट आणि चार एलईडी टीव्ही शहरातील संजयनगर मुरी मरघट परिसरातून जप्त केले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथील विकास दिगंबर रहांगडाले (२८) हे गोंदिया येथील फ्लिपकार्ट कुरिअर हबमध्ये इन्चार्ज म्हणून कार्यरत असून ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १ ते सकाळी ११ वाजताच्या सुमरास अज्ञात चोरट्याने कुरिअर हबमधून एक पॅनासोनिक कंपनीचे एसी आऊटडोअर युनिट किमत ४० हजार रुपये, सॅमसंग कंपनीचे ५५ इंची तीन टीव्ही किमत ९९ हजार रुपये आणि टीएलसी कंपनीचा ५५ इंची एक टीव्ही किमत ३१ हजार रुपये, असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी विकास रहांगडाले यांच्या तक्रारीवरून २ नोव्हेंबर रोजी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी डी.बी. पथकाचे अधिकारी व कर्मचार्यांना संजयनगर मुरी मरघट परिसरात टीव्हीसारखे साहित्य बेवारस अवस्थेत पडून असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत साहित्याची पडताळणी केली. तपासणीअंती हा मुद्देमाल फ्लिपकार्ट कुरिअर हबमधून चोरीस गेलेलाच असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या नेतृत्वात डी.बी. पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका बैस, सहाय्यक फौजदार कवलपालसिंग भाटिया, पोलिस हवालदार सुदेश टेंभरे, निशिकांत लॉदासे, कमलेश शहारे तसेच पोलिस कर्मचारी दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे, अजय बोपचे व राकेश डोंगरवार यांनी केली.