काठमांडू,
helicopter crash in nepal नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट परिसरात मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. सोलुखुम्बू जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर उतरण्याच्या तयारीत असलेली दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. नेपाळ पोलिसांनी 'एक्स' या समाजमाध्यमावरून या घटनेची माहिती दिली. राजधानी काठमांडूपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. मृत व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे सुरुवातीच्या वृत्तात सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप निश्चित झालेले नाही.

फिशटेल एअर आणि डायनेस्टी एअर या कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ही टक्कर झाली. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही हेलिकॉप्टर खुम्बू पासांग ल्हामू येथील फेरिचे हेलिपॅडकडे उतरण्यासाठी येत असताना त्यांच्या रोटर ब्लेडची एकमेकांना धडक बसली. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले असून त्यामध्ये दोन्ही हेलिकॉप्टर एकमेकांच्या अतिशय जवळ आल्याचे दिसत आहे. सोलुखुम्बू जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी नबिनराज बुढाथोकी यांनीही या अपघाताला दुजोरा दिला आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने लुकला येथे हलविण्यात आला.
या अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला उपचारासाठी अन्य हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनीही दोन हेलिकॉप्टरमध्ये टक्कर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, संबंधित यंत्रणांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा तपास सुरू आहे. नेपाळमध्ये पर्यटक आणि गिर्यारोहकांची वाहतूक, जीवनावश्यक साहित्याची ने-आण तसेच आपत्कालीन बचावकार्यासाठी लहान हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या दुर्घटनेने हिमालयीन भागातील हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.