पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार- प्रधानमंत्री मोदी

देशातील मेट्रोचे जाळे १२०० किलोमीटरवर; २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
पुणे,
Inauguration of 'Man-Hinjawadi to Shivajinagar route-3' पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील मोठ्या आयटी क्षेत्राला अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’चे उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-२’च्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
 
 
modi
 
पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप, नवोपक्रम आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असून, मेट्रोच्या वाढत्या सुविधांमुळे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे नमूद करून प्रधानमंत्री म्हणाले, देशात २०१४ मध्ये केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्क जगातील पहिल्या तीन मोठ्या मेट्रो नेटवर्कमध्ये गणले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्रात २०१४ मध्ये केवळ १० ते ११ किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होता. आज सुमारे २०० किलोमीटर मेट्रो मार्ग सेवेत असून, ६८० किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत. राज्यात मेट्रो पायाभूत सुविधांवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली असल्याचे  मोदी म्हणाले.
 
 
मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहराची उत्पादकता वाढते आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. पुणे मेट्रोचा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर उभारण्यात आला असून, सरकार आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांतून विकासाची नवी संधी निर्माण होत आहे. शहरांची स्पर्धात्मकता आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.देशातील शहरांना विकासाची केंद्रे बनविण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून आगामी काळात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच गेल्या १० ते १२ वर्षांत ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर पडण्यास यश आल्याचा उल्लेख जागतिक बँकेच्या अहवालाच्या संदर्भाने त्यांनी केला. पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे प्रधानमंत्री मोदी म्हणाले.
 
महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी काळजी करू नये, संकटाच्या काळात सरकार त्यांना मदत करेल. दिवाळीच्या सणात दुष्काळग्रस्त आणि संकटात असलेल्या शेतकरी कुटुंबांचाही विचार करून त्यांच्या घरातही सणाचा आनंद निर्माण होण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.२०३० पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआर क्षेत्र देशाचे महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, इनर रिंगरोड, आउटर रिंगरोड, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.