भारतीय जहाजावरील हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध

परराष्ट्र मंत्रालयाची चिंता व्यक्त

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
ओमान,
India strongly condemns attack on Indian ships ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध नोंदवला असून, व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. ओमानमधील लिमाह परिसरानजीक 'एमएसव्ही अल जुसुफी' या व्यापारी जहाजावर सोमवारी संध्याकाळी हल्ला झाला होता. या जहाजावर एकूण १४ भारतीय नागरिक होते. त्यापैकी १३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेतील जीवितहानीबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
 
 

sheep attak 
 
या दुर्घटनेनंतर ओमानमधील भारतीय दूतावासाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून, बचावलेल्या भारतीय नागरिकांना तसेच मृत खलाशाचा पार्थिव देह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. संबंधित प्रक्रियेला गती देण्यासाठी भारतीय यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या घटनेमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटनांबाबत भारताने चिंता व्यक्त केली आहे.
 
 
परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित क्षेत्रातील तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले आहे. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या राजनैतिक चर्चांना लवकरात लवकर सकारात्मक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही भारताने म्हटले आहे. व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या घटना त्वरित थांबवाव्यात, अशी भूमिका मंत्रालयाने मांडली. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून या भागातील आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील जहाजांची वाहतूक आणि व्यापार कोणत्याही अडथळ्याविना पूर्ववत सुरू करण्याची मागणी भारताने केली आहे.