जयस्वालचा शतकी धमाका; सुदर्शन अपयशी!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
न्यूझीलंड,
jaiswals-explosive-century न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यात सुरू असलेल्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालने शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, दुसरीकडे साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात आघाडी घेतली आहे.
 
jaiswals-explosive-century
 
भारत 'अ' कडून खेळणाऱ्या जयस्वालने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत अवघ्या ११९ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. षटकार ठोकून त्याने शतकाचा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांत अनुक्रमे १७ आणि ५ धावा करून बाद झालेल्या जयस्वालकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने शतक झळकावत आपल्या फलंदाजीतील लय पुन्हा मिळवली.
 
मात्र, जयस्वालच्या या दमदार खेळीच्या तुलनेत साई सुदर्शनची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याला ३४ चेंडूंचा सामना करूनही केवळ ११ धावा करता आल्या. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्याने ९१ धावा केल्या होत्या. या सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही. देवदत्त पडिक्कललाही आपली छाप पाडता आली नाही. तो शून्यावरच माघारी परतला. यापूर्वीच्या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले होते.
 
सामन्याच्या पहिल्या डावात भारत 'अ' संघाने ३४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड 'अ' संघाने ४२४ धावांची मजल मारत आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी २५० हून अधिक धावा केल्या असून संघाने पुन्हा आघाडी घेतली आहे. आता उर्वरित फलंदाज किती धावा करतात आणि कर्णधार ध्रुव जुरेल न्यूझीलंडसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो, याकडे लक्ष लागले आहे. सामन्याचा चौथा दिवस सुरू असल्याने निकाल लागण्यापेक्षा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र आहे.