मुंबई,
jios-four-affordable-recharge-plans मोबाईल रिचार्जवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी चार स्वस्त प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) शिफारशीनुसार हे प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कमी किमतीत अमर्यादित कॉलिंग आणि महिनाभराची वैधता मिळणार असल्याने फीचर फोन वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो.
ट्रायने दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये केलेल्या १३ व्या दुरुस्तीनुसार कंपन्यांना परवडणारे केवळ व्हॉइस कॉलिंगचे प्लॅन उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. ग्राहकांवरील रिचार्जचा आर्थिक भार कमी करणे हा यामागील उद्देश आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियानंतर आता जिओनेही या सूचनेनुसार चार नवीन पर्याय आणले आहेत.
जिओच्या या प्लॅनची किंमत १४७, १७७, १९६ आणि १९७ रुपये आहे. तुलनेत एअरटेलचा सर्वात स्वस्त ट्रायच्या निकषांनुसार असलेला प्लॅन १८५ रुपयांचा आहे. तर व्होडाफोन-आयडियाचा अशाच प्रकारचा सर्वात स्वस्त प्लॅन १७९ रुपयांना उपलब्ध आहे. व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनची वैधता २५ दिवसांची आहे. १४७ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना २२ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग आणि ३०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे.
१७७ रुपयांचा प्लॅन निवडणाऱ्या ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्येही अमर्यादित कॉलिंग, नॅशनल रोमिंग आणि ३०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. तर १९६ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३० दिवसांची वैधता देण्यात आली आहे. कॉलिंग आणि रोमिंगच्या सुविधांसह ग्राहकांना ३०० एसएमएस मोफत मिळणार आहेत.
जिओचा १९७ रुपयांचा प्लॅन मात्र वैधतेच्या बाबतीत वेगळा आहे. यामध्ये कॅलेंडर महिन्यानुसार वैधता निश्चित केली जाते. म्हणजेच ज्या तारखेला रिचार्ज केला जाईल, त्यानुसार पुढील महिन्यात त्याच तारखेपर्यंत सेवा उपलब्ध राहील. या प्लॅनमध्येही संपूर्ण भारतात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग आणि ३०० एसएमएस मिळतात. एकंदरीत, कमी खर्चात केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी जिओचे हे चार रिचार्ज पर्याय उपलब्ध झाले आहेत.