तळेगाव (श्या.पंत)
loan-recovery कर्ज देताना गोड बोलायचे आणि हप्ते वसुलीची वेळ आली की थेट दारात जाऊन अपमान, शिवीगाळ आणि धमकावणी करायची! मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कथित वसुली पद्धतीमुळे पिलापूर व येणाडा परिसरातील कर्जदार महिलांचे जगणे असह्य झाले आहे. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती दुसरीकडे रोजगाराचा अभाव आणि हाताला काम नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांवर आता कर्जवसुलीचा वरवंटा फिरत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही महिलांवर गाव सोडण्याची वेळ येऊन ठेपल्याची गंभीर बाब निवेदनातून समोर आली आहे.
महिलांनी कर्ज घेतले आहे. कर्ज फेडण्याची त्यांची तयारीही आहे. मात्र, हाताला रोजगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही, अशा परिस्थितीत हप्ते भरायचे तरी कुठून? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलांवर दबाव आणणे, घरी जाऊन अपमानीत करून धमकावल्या जात आहे.
या कथित मनमानी वसुलीविरोधात पिलापूर व येणाडा येथील महिलांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्यवस्थापनाला आणि वसुली एजंटांना तातडीने लगाम घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सक्तीची वसुली, शिवीगाळ आणि धमकावणे तात्काळ थांबवावे, कर्जदार महिलांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईपर्यंत हप्ते भरण्यास मुदत किंवा पुनर्नियोजनाची सुविधा द्यावी, महिलांचा अपमान करणार्या वसुली एजंटांची चौकशी करून कारवाई करावी तसेच संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांची संयुक्त बैठक घेऊन कर्जदार महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आम्ही कर्ज फेडण्यास नकार देत नाही. मात्र, सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रोजगार नाही, उत्पन्न नाही. अशा परिस्थितीत आम्हाला काही काळाची मुदत देऊन सन्मानाने जगण्याची संधी द्यावी, अशी विनंती महिलांनी केली आहे.