‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’वरून रुपाली चाकणकरांसोबत वाद

दिपाली सय्यद स्पष्टच म्हणाल्या, “तुम्ही स्वतःवर ओढावून घेताय…

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
मुंबई
maharashtra epstein files controversy महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या आगामी चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वासह राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे आणि त्याच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या विषयावर आधारित चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अशोक खरातची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी साकारत असून, अभिनेत्री दिपाली सय्यदही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटावरून सुरू झालेल्या चर्चेत आता दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
 

maharashtra epstein files controversy 
 
 
चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना तो दाखवणार का, तसेच चित्रपटामुळे त्यांची बदनामी होत असल्याचा आरोप केला जात आहे, असा प्रश्न दिपाली सय्यद यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “त्या स्वतःवरच हे ओढवून घेत आहेत. आम्ही चित्रपटात त्यांच्या नावाचा वापरदेखील केलेला नाही,” असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे दिपाली सय्यद यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावरून सुरू झालेल्या वादाबाबत बोलताना दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकर यांनाच चित्रपट पाहण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “त्यांनी सिनेमा पाहण्यासाठी आधी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाची भाषा बोलता, त्याचप्रमाणे आम्हालाही न्यायालयाची भाषा समजते. तुम्ही एफआयआर दाखल केली आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असताना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करता येत नाही, तरीही तुम्ही तक्रार दाखल केली. त्यापेक्षा आधी चित्रपट पाहण्यासाठी या, आमच्याशी चर्चा करा, बसा आणि तुम्हाला नेमके काय वाटते ते सांगा.”
या चित्रपटातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक मांडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट कोणत्याही एका व्यक्तीची जीवनकहाणी किंवा चरित्र नसल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या नावाचा वापर करण्यात आलेला नाही, असेही त्यांना आधीच सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा आपलीच आहे, असे स्वतःहून ठरवले जात आहे. “तुम्हीच म्हणत आहात की, ती व्यक्तिरेखा मीच आहे. तुम्ही स्वतःवरच ते ओढवून घेत आहात. अशा प्रकारे तुम्हीच सांगत आहात की ती व्यक्तिरेखा तुमची आहे. तुम्ही असे केले नसते, तर कोणीही ती व्यक्तिरेखा तुमची आहे, असे म्हटले नसते. मग असे का करत आहात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
 
दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या चित्रपटात भोंदूबाबा अशोक खरात याची भूमिका मनोज जोशी साकारत आहेत. त्यांच्यासोबत दिपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर आणि माधुरी पवार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक बाबी तसेच कथित गुपिते प्रेक्षकांसमोर येणार असल्याचा दावा केला जात आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आणि दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.