मुरासू चक्रीवादळाचा आंध्रला तडाखा; पुढील १२ तास धोक्याचे!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
ओंगोले,
Murasu Chakrivadhacha Andhrala Tadakha ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास या चक्रीवादळाने किनारपट्टी ओलांडली. मात्र, वादळाचा उर्वरित भाग जमिनीवर येण्याची प्रक्रिया सुरू असल्याने किनारपट्टीवरील भागांना पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. बापटला येथे तब्बल २२२.४ मिमी पावसाची नोंद झाली असून नरसपूर, ओंगोले आणि मछलीपट्टणम परिसरातही मुसळधार पाऊस झाला आहे. परिस्थितीवर भारतीय हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.
 
 
 
fh76897
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ‘मुरासू’ चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात सक्रिय होते. मागील सहा तासांत हे वादळ ताशी सुमारे ८ किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकत होते. त्यावेळी वादळाचे केंद्र ओंगोलेच्या ३० किलोमीटर उत्तर-ईशान्येस, बापटलाच्या ४० किलोमीटर नैऋत्येस, कावलीच्या ९० किलोमीटर उत्तर-ईशान्येस, विजयवाडाच्या १०० किलोमीटर दक्षिण-नैऋत्येस आणि मछलीपट्टणमच्या १२० किलोमीटर पश्चिम-नैऋत्येस होते. या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
भारतीय हवामान विभागाने दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात पुढील १२ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत ‘मुरासू’ची तीव्रता कमी होऊन त्याचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र, कमकुवत झाल्यानंतरही पाऊस आणि वाऱ्यांचा प्रभाव लगेच कमी होणार नाही, असा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर राहू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी १०० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.