ओमान,
Oman Sea near Indian Ship Attack ओमानच्या किनारपट्टीजवळ सोमवारी भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाला अज्ञात वस्तूने धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत गुजरातमधील एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून जहाजावरील अन्य १३ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. ओमानच्या तटरक्षक दलाने बचावकार्य राबवत सर्व १३ खलाशांची सुखरूप सुटका केली.
मंत्र्यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर दिलेल्या माहितीनुसार, 'एमएसव्ही अल जुसुफी' हे भारतीय जहाज ओमानच्या किनाऱ्याजवळून प्रवास करत असताना त्याला एका अज्ञात वस्तूची धडक बसली. त्यावेळी जहाजावर एकूण १४ भारतीय खलाशी कार्यरत होते. या घटनेनंतर जहाजावरील १३ जणांनी सुरक्षित बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यानंतर ओमानच्या तटरक्षक दलाने त्यांना बचावले. मात्र, या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका खलाशाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत खलाशाची ओळख गुजरातमधील रहिवासी गंधार नाहिम अझीझ अशी करण्यात आली आहे. उर्वरित १३ भारतीय खलाशांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. दरम्यान, जहाजाला धडक देणारी अज्ञात वस्तू नेमकी कोणती होती, हा हल्ला कोणी केला आणि त्यामागील कारण काय होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट झालेले नाही.