५० तोळे सोने, २५ लाख रुपये देऊनही पायलचा छळ?

पायल झांबरेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
पुणे,
Payal Jhambrey's death पायल पवार-झांबरे यांच्या मृत्यूप्रकरणात हुंड्याची मागणी आणि कौटुंबिक छळासंदर्भातील गंभीर माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये पायल आणि अक्षय झांबरे यांचा विवाह झाला होता. त्यावेळी पवार कुटुंबीयांनी ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये रोख दिले होते, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली. तरीही दिवाळीच्या निमित्ताने सासरच्या मंडळींकडून पाच तोळे सोन्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. मुलगा व्हावा, यासाठी पतीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचेही पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी पायल यांनी भावाला संदेश पाठवून सासूला जबाबदार धरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
 
s346567
 
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पायल यांचा सासूशी वाद झाला होता. त्यानंतर त्या घरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचा शोध सुरू करण्यात आला. कुटुंबीय आणि नातेवाईक शोध घेत असताना मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये पायल मृतावस्थेत आढळल्या. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नाही. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला अटक केली असून पती अक्षय, सासू मंगल अरविंद झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली असून मृत्यूमागील परिस्थिती आणि छळाच्या आरोपांचा तपास सुरू आहे.
 
 
पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, विवाहानंतरपासूनच त्यांचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत होता. प्रत्येक दिवाळीत पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. पायल यांचे माहेरचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढील हंगामापर्यंत मुदत मागितली होती. मात्र, त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २०२२ मध्ये पायल गर्भवती असताना मुलगाच व्हावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. ३० मार्च २०२३ रोजी मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी रुग्णालयात येऊन वाद घातला आणि पायल किंवा बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या सर्व आरोपांची पोलीस चौकशी करीत आहेत.