दिवाळी खरेदीपूर्वी सोन्याचा भाव वाढला!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
price of gold price increased दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या खरेदीची तयारी सुरू असतानाच सोने-चांदीच्या बाजारभावात पुन्हा बदल झाला आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली, तर चांदीच्या दरात किंचित घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी वाढून १ लाख ३९ हजार ५२० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४६० रुपयांची वाढ झाली असून तो १ लाख २७ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३९ हजार २० रुपये होता. दागिने तयार करण्यासाठी प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो, तर २४ कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध मानले जाते.
 
 
gold
 
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र नरमाई दिसून आली आहे. मंगळवारी चांदीचा भाव किलोमागे १०० रुपयांनी कमी होऊन १ लाख ९९ हजार ९०० रुपयांवर आला. सोमवारी हाच दर २ लाख रुपये होता. सध्याच्या बाजारभावानुसार एक ग्रॅम चांदी १९९.९० रुपये, १० ग्रॅम १,९९९ रुपये, तर १०० ग्रॅम चांदी १९,९९० रुपयांना मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. ३० ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ९० रुपये होता. तो २ नोव्हेंबरपर्यंत घसरून १ लाख ३९ हजार २० रुपयांवर आला. त्यानंतर ३ नोव्हेंबरला पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भावही २८ ऑक्टोबर रोजी सुमारे २ लाख २० हजार रुपये प्रति किलो होता. तो २ नोव्हेंबरपर्यंत घसरून २ लाख रुपयांवर आला.
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, कच्च्या तेलाच्या किमती आणि गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी-विक्री या घटकांचा सोने-चांदीच्या दरांवर परिणाम होत असतो. याशिवाय दिवाळी आणि धनत्रयोदशीसारख्या सणांच्या काळात दागिन्यांची मागणी वाढल्याने देशांतर्गत बाजारातील किमतींमध्येही चढ-उतार होतात. रुपया कमकुवत झाल्यास परदेशातून सोने आयात करणे महाग पडते आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारातील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीचे भाव कोणते वळण घेतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.