ऐन दिवाळीच्या तोंडावर धानाचे भाव गडगडले!

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
गोंदिया,
right-on-the-eve-of-diwali गेल्या महिन्यात उच्च प्रतीच्या धानाला मिळालेल्या विक्रमी दरामुळे आनंदात असलेल्या शेतकर्‍यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेले बारीक धानाचे दर नोव्हेंबरच्या प्रारंभीच तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी घसरले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरघसरणीमागे बाजार समिती प्रशासन, स्थानिक व्यापारी आणि दलालांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी करीत आहेत.
 
 
right-on-the-eve-of-diwali
 
राज्यात ‘भाताचे कोठार’ म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात खरीप आणि उन्हाळी हंगामात उच्च प्रतीच्या धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील तांदळाला देशांतर्गत बाजारपेठेसह विदेशातही मागणी आहे. त्यामुळे बारीक आणि उच्च दर्जाच्या धानाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना असते. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आंतरराज्य बाजारपेठेत उच्च प्रतीच्या तांदळाची मागणी वाढल्याने दरात मोठी तेजी आली होती. विशेषतः आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापार्‍यांकडून बारीक धानाला चांगला भाव मिळत असल्याने स्थानिक बाजारातही दर ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे बारीक धान उत्पादक शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी आर्थिकदृष्ट्या सुखाची जाईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बाजाराचे चित्र अचानक बदलले.
 
 
उच्च प्रतीच्या धानाचे दर हजार ते बाराशे रुपयांनी खाली आल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या घसरणीमुळे शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापार्‍यांनी सुरुवातीला बारीक धानाला उच्च दर दिले. मात्र, स्थानिक व्यापारी आणि दलालांना ही तेजी मान्य नसल्याने त्यांनी बाजार समिती प्रशासनाला अप्रत्यक्षपणे हाताशी धरून बाहेरून आलेल्या व्यापार्‍यांना विश्वासात घेतले आणि धानाचे दर पाडले, असा आरोप शेतकरी करीत आहेत. या कथित संगनमतामुळे बाजारातील स्पर्धा संपवून शेतकर्‍यांच्या मालाला अपेक्षित भाव मिळू दिला जात नसल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये आहे. दरातील घसरण ही केवळ बाजारातील सामान्य चढ-उतार आहे की त्यामागे नियोजनबद्ध हस्तक्षेप आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरवाढीच्या काळात शेतकर्‍यांना मिळालेला फायदा अचानक हिरावून घेतला जात असल्याने बाजार समितीच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे.
  
धानाचे दर तांदळाची मागणी, आवक आणि व्यापार्‍यांकडील साठा यावर अवलंबून असतात. ऑक्टोबरमध्ये बारीक तांदळाला चांगली मागणी असल्याने दर वाढले होते. मात्र, नोव्हेंबरच्या सुरुवातीला खरेदीतील तेजी कमी झाल्याने दरात घसरण झाली आहे. प्रत्येक दरघसरणीमागे संगनमत असतेच असे नाही.
- जगदीश गौतम धान व्यापारी, तिरोडा