नाशिक,
Seven crore for Simhastha नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यासाठी राज्य शासनाने आखाड्यांच्या विकासनिधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रत्येक आखाड्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, विकासकामांची व्याप्ती लक्षात घेता साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निधी पाच कोटी रुपये करण्यात आला. तरीही कामांसाठी अधिक निधीची गरज असल्याने शासनाने आणखी दोन कोटी रुपयांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आखाड्याला सात कोटी रुपये मिळणार आहेत. या निर्णयामुळे आखाडा परिषदेने समाधान व्यक्त केले असून, साधू-महंतांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

त्र्यंबकेश्वरमधील १० शैव आखाडे आणि नाशिकमधील तीन वैष्णव आखाड्यांनी त्यांच्या परिसरात आवश्यक असलेल्या विकासकामांची यादी नगरपालिका आणि संबंधित प्रशासनाकडे सादर केली आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली जाणार आहे. नव्या घाटांची निर्मिती, दर्शनपथ तयार करणे, अपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था आणि अतिक्रमण हटविणे अशा विविध कामांचा यात समावेश आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणी पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने जुलै २०२७ पर्यंत सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी सात ते आठ महिने या कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविक आणि साधू-संतांसाठी आखाड्यांमध्ये चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्रांची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे. नाशिकमधील तीन आणि त्र्यंबकेश्वरमधील दहा अशा एकूण १३ आखाड्यांतील अन्नछत्र शिवसेनेच्या वतीने चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे आखाड्यांवरील भोजनव्यवस्थेचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाकडून कामे सुरू करण्यास झालेल्या विलंबामुळे अनेक विकासकामे अद्याप प्राथमिक किंवा अपूर्ण अवस्थेत असल्याचे महंत शंभरानंद सरस्वती यांनी सांगितले. प्रशासनाने आता कामांचा वेग वाढविल्यास जुलैपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊ शकतील आणि सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महंत शंभरानंद सरस्वती हे त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष आहेत.