नवी दिल्ली,
Signs of a slowdown in the gold market आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतींनी घेतलेली मोठी झेप आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीतील प्रतिकूल बदल यामुळे भारतातील सोन्याच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. २०२६ या वर्षात देशातील सोन्याची एकूण मागणी गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) व्यक्त केली आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हा अंदाज मांडण्यात आला आहे. सोन्याचे वाढलेले दर पाहता ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीकडे पाठ फिरवली असून गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक देश आहे. मात्र, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली महागाई आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर आलेला ताण यामुळे बाजारातील मागणी घटली आहे. त्यातच यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याने दागिन्यांच्या खरेदीतही मंदी आली आहे.
‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या भारतीय विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे यंदा देशातील सोन्याची एकूण मागणी सुमारे ६५० मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे. कोविड-१९ महामारीमुळे २०२० मध्ये लागू झालेल्या टाळेबंदीनंतरची ही सर्वात कमी मागणी ठरू शकते. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्क्यांची घट होऊन ती १६२.५ मेट्रिक टनांवर आली. याच काळात दागिन्यांच्या मागणीत २० टक्के, तर गुंतवणुकीच्या उद्देशाने होणाऱ्या सोन्याच्या खरेदीत ४० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
दरम्यान, दिवाळी आणि आगामी लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीत काहीशी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे डिसेंबरच्या तिमाहीत बाजाराला काही प्रमाणात चालना मिळू शकते. मात्र, सोन्याचे चढे दर आणि अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली घट ही मागणीतील वाढ रोखू शकते. भारतातील एकूण सोन्याच्या मागणीपैकी ५० टक्क्यांहून अधिक मागणी ग्रामीण भागातून येते. याशिवाय, यंदाच्या पावसाळ्यात गेल्या एका दशकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याने कृषी उत्पादन आणि ग्रामीण उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सरकारने वर्षाच्या सुरुवातीला सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यामुळे अधिकृत आयात कमी झाली असून, अप्रत्यक्ष आणि बेकायदेशीर मार्गाने होणारी सोन्याची आवक वाढल्याचेही सचिन जैन यांनी नमूद केले.