थकित देयकांसाठी ‘तेरवी आंदोलन’

अभियंता व कंत्राटदारांकडून शासनाचा निषेध

    दिनांक :03-Nov-2026
Total Views |
अमरावती,
Teravi Protest जिल्ह्यातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे कंत्राटदारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य अभियंता संघटना व राज्य कंत्राटदार महासंघातर्फे सोमवार, २ नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर प्रतीकात्मक ‘तेरवी आंदोलन’ करण्यात आले.
 
 
Teravi Protest
जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची देयके मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. निधीअभावी कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली असून, कामे करूनही मोबदला मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या गंभीर प्रश्नावर शासन आणि प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
प्रलंबित देयकांमुळे कंत्राटदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, काही कंत्राटदारांवर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत असल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. कंत्राटदारांच्या समस्यांची दखल घेऊन थकित देयके तातडीने अदा करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांना निवेदने देऊनही प्रश्न मार्गी लागला नसल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यावेळी राज्य अभियंता संघटना, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष उज्ज्वल पांडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल मुराई आणि जिल्हा सचिव गजानन दुबळी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शासनाने प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी मागणी संघटनेने केली. यावेळी दोन्ही संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.