नागपूर,
crime committed सुरेंद्रनगर येथील डॉक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ४२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांचा गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाने पर्दाफाश केला. या चोरीत एका अल्पवयीनाची मदत घेण्यात आली होती. पोलिसांनी करण मेश्राम (१९) याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
सुरेंद्रनगर येथील डॉ. अतुल कापसे हे आपल्या भावासह आईला आणण्यासाठी ओडिशातील भुवनेश्वर येथे गेले होते. २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २५ हजार रुपये रोख, २९६.०७ ग्रॅम सोने आणि ६२४.९३ ग्रॅम चांदी असा एकूण ४२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडीचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. दरम्यान, रविवारी गुन्हे शाखेच्या घरफोडीविरोधी पथकाला एक अल्पवयीन संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याची चौकशी केली असता त्याने करण मेश्राम याचे नाव सांगितले. करणच्या मदतीनेच घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी दोघांकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दोघांनाही पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.crime committed सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने करण मेश्राम याला पोलिस कोठडी सुनावली, तर अल्पवयीनाची रवानगी बालसुधारगृहात केली.