पुणे,
Vidarbhat stormy rain signal बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'मुरासू' चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांच्या हवामानात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वादळाचा मुख्य परिणाम आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर होणार असला, तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत पुढील ४ ते ५ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असून, ४ नोव्हेंबरदरम्यानही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागांत ताशी ३० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. ४ नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील 'मुरासू' चक्रीवादळ मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर काही वेळा तो ताशी १२० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ओंगोलच्या दक्षिणेकडील नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान हे वादळ किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारी सायंकाळपूर्वीच्या सहा तासांत या वादळाने ताशी १४ किलोमीटर वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने प्रवास केला होता.
या चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, ओडिशा आणि केरळ या राज्यांमध्येही जाणवणार आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसह रायलसीमा भागात सलग दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तेलंगणमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून, तमिळनाडूमध्ये ७ नोव्हेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. ओडिशामध्ये ४ नोव्हेंबरपर्यंत, तर केरळमध्ये ७ आणि ८ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.