चेन्नई,
Vijay government provides relief to the film industry तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील चित्रपट निर्मात्यांना दिवाळीची विशेष भेट दिली आहे. तमिळनाडू सरकारच्या वतीने २२४ चित्रपटांच्या निर्मात्यांना एकूण १५.६८ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. चेन्नईतील चेपॉक येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री राजमोहन अरुमुगम यांच्या हस्ते प्रत्येक निर्मात्याला ७ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. कमी खर्चात तयार होणाऱ्या आणि प्रदर्शित होणाऱ्या तमिळ चित्रपटांना प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीला चालना देणे, हा या योजनेमागील उद्देश आहे.

चित्रपट निर्माते टी. शिवा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. गेल्या सात वर्षांपासून हे अनुदान प्रलंबित होते. अखेर मुख्यमंत्री विजय यांनी तातडीने निधी मंजूर केल्याने २२४ निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. 'अम्मा क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेशी संबंधित असलेले टी. शिवा 'दैवा वाक्कु', 'अरविंदन', 'सरोजा' आणि 'अरवान' यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी ओळखले जातात. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि मंत्री राजमोहन अरुमुगम यांचे आभार मानले. या अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांपैकी ९० टक्के लोकांची उपजीविका चित्रपट निर्मितीवर अवलंबून होती आणि त्यांना या मदतीमुळे पुन्हा काम सुरू करण्याची संधी मिळेल, असेही शिवा यांनी म्हटले आहे.
या अनुदानासाठी २०१५ ते २०२२ या कालावधीत तयार झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती एस. के. कृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या चित्रपटांची छाननी करून लाभार्थ्यांची निवड केली. कार्यक्रमात मंत्री राजमोहन यांनी दिग्दर्शक भरतिराजा यांच्या १९९४ मधील 'करुथम्मा' या चित्रपटाचा उल्लेख केला. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या सामाजिक समस्यांवर जनजागृती करणाऱ्या चित्रपटांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. व्यावसायिक नफ्यापलीकडे जाऊन समाजहिताचे विषय मांडणाऱ्या निर्मात्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच, भविष्यात तमिळ चित्रपटसृष्टीतील राज्य पुरस्कार गुणवत्ता आणि प्रामाणिकतेच्या आधारावरच दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.