कांबळे
नागपूर
accident-nagpur मानकापुरातील गोधनी रोडवर एका भरधाव ट्रकने दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर तिचा १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी झाला. अश्विनी पंकज फलके असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर गोधनी रोडवर संतप्त नागरिकांनी रस्ता बंद केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झिंगाबाई टाकळी परिसरातील गरबा बिर्याणीच्या बाजूला, बालवाडा परिसरानजीक घडला. यावेळी ट्रकची धडक बसल्याने अश्विनी फळके यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे मुलगा गंभीर जखमी झाला तर पतीही किरकोळ जखमी झाला. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबासोबत असलेल्या चार वर्षांच्या चिमुरड्यासमोरच आईचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरिक आणि मृत महिलेच्या नातेवाइकांमध्ये संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम केला. नागरिकांनी वाहतूक अडवून आपला निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे गोधनी रोडवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
पोलिसांचा ताफा तैनात
या अपघातानंतर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या नागरिकांची अप्पर आयुक्त एस. विनीता, वाहतूकचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, उपायुक्त रमेश धुमाळ यांनी समजूत घालून कठोर कारवाई करण्याची हमी दिली. मात्र, नागरिकांचा रोष वाढतच गेल्यामुळे अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलविण्यात आली.