दिवाळीआधी डीएत ३ टक्क्यांची वाढ!

पंजाब सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
चंदिगढ,
3 percent increase in DA before Diwali पंजाबमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे एकूण महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ८ लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
 
546768789
 
 
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्याची ३ टक्क्यांची वाढ लागू करण्यासाठी सरकारकडून एकूण ३,९८८ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. मान यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत महागाई भत्त्यात एकूण ११ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सरकारचा आधारस्तंभ संबोधत त्यांच्या कल्याणासाठी आणि हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केले. तसेच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
 
 
या निर्णयानंतर पंजाबमधील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पंजाबमध्ये औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीनेही मोठा प्रकल्प येणार आहे. लुधियाना येथे जपानमधील आयची स्टील आणि वर्धमान स्पेशल स्टील्स यांच्या संयुक्त भागीदारीत १,११६ कोटी रुपये खर्चून नवीन औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील चर्चा डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान सुरू झाली होती. त्यावेळी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती.