देवळी
illegal-water-connections पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी नाचनगाव ग्रामपंचायतीने अवैध नळ कनेक्शनधारकांविरुद्ध धडक मोहीम राबविली. या कारवाईत ४१ अवैध नळ कनेक्शन बंद करण्यात आले तर एक मोटर पंप जप्त करण्यात आला.
नाचनगावची लोकसंख्या १८ हजार ७९१ असून गावात सहा प्रभाग आहेत. वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता ग्रापंच्या भरारी पथकाने सहाही प्रभागांत तपासणी केली. यावेळी अवैध नळ जोडण्या शोधून त्या कापून पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
ही मोहीम तहसीलदार समर्थ क्षीरसागर, गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे, विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक, मुरार व नायब तहसीलदार श्याम कावठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान प्रशासक युवराज जंगले, ग्रामपंचायत अधिकारी संजय लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, नळांना तोट्या बसवाव्यात आणि अवैध नळ कनेक्शन तातडीने काढून नियमित जोडणीसाठी ग्रापंकडे अर्ज करावा, असे आवाहन केले आहे. अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व पाणीपुरवठा नियमांनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासक युवराज जंगले यांनी दिला.