डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय; ट्रम्प यांना मोठा धक्का

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
टेक्सास,
A historic victory for the Democrats अमेरिकेच्या राजकारणात २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांनी मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. अमेरिकेतील सर्वाधिक मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या टेक्सासमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर डेमोक्रॅटिक पक्षाने गव्हर्नरपदावर विजय मिळवला आहे. एवढेच नव्हे, तर तब्बल ३३ वर्षांनंतर या राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार सिनेटवर निवडून आला आहे. या निकालामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. दीर्घकाळ रिपब्लिकन पक्षाचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या टेक्सासमध्ये डेमोक्रॅट्सने मिळवलेला हा विजय अमेरिकेच्या राजकारणातील बदलते समीकरण अधोरेखित करणारा ठरला आहे.
 
gj7898909
 
 
टेक्सासच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जीना हिनोजोसा यांनी सुमारे ५६.८ टक्के मते मिळवत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांचा पराभव केला. अॅबॉट यांना सुमारे ४१.९ टक्के मते मिळाली, तर लिबर्टेरियन पक्षाचे पॅट डिक्सन यांना सुमारे १ टक्का मते मिळाली. या निकालामुळे सलग चौथ्यांदा टेक्सासचे गव्हर्नर होण्याचे अॅबॉट यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. दुसरीकडे, सिनेटच्या एका जागेवरही डेमोक्रॅटिक पक्षाने रिपब्लिकन उमेदवाराला पराभूत केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे जेम्स टालारिको यांनी रिपब्लिकन पक्षाचे केन पॅक्स्टन यांचा पराभव केला. यापूर्वी १९९० मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या अॅन रिचर्ड्स यांनी टेक्सासचे गव्हर्नरपद जिंकले होते. मात्र, १९९४ मध्ये जॉर्ज बुश यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर १९९५ ते २०२६ या कालावधीत राज्यात रिपब्लिकन पक्षाचेच गव्हर्नर राहिले.
 
 
टेक्सासमधील या राजकीय बदलामागे महागाई, अर्थव्यवस्था आणि मतदारांमधील नाराजी ही प्रमुख कारणे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा खर्च यामुळे मतदारांच्या भूमिकेत बदल झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः टेक्सासमधील मोठ्या संख्येने असलेल्या हिस्पॅनिक मतदारांचा बदललेला कल डेमोक्रॅट्सच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरल्याचे मानले जाते. २०२४ च्या निवडणुकीत या समुदायाचा मोठा पाठिंबा ट्रम्प यांना मिळाला होता; मात्र २०२६ मध्ये परिस्थिती बदलल्याचे चित्र दिसले. याशिवाय ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांबाबत निर्माण झालेला असंतोषही रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. त्यामुळे टेक्सासमधील हा निकाल केवळ राज्यापुरता मर्यादित नसून आगामी काळात अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक राजकीय वर्चस्वाला आव्हान देणारा ठरू शकतो.