अर्शदीपच्या सेलिब्रेशनमागचं गर्लफ्रेंडसाठीचं खास सरप्राइज!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
ऑकलंड,
arshdeeps-celebration भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या आपल्या गोलंदाजीसोबतच अनोख्या सेलिब्रेशनमुळेही चर्चेत आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विकेट मिळवल्यानंतर अर्शदीपने केलेल्या खास डान्समागचं कारण आता स्वतःच उघड केलं आहे. हे सेलिब्रेशन त्याने आपल्या गर्लफ्रेंडसाठी केल्याचे त्याने सांगितले.
 
arshdeeps-celebration
 
ऑकलंडमधील ईडन पार्कवर झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. खेळपट्टीवरील परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय संघाने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली. हा निर्णय यशस्वी ठरवत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १८५ धावांवर संपवला. यात अर्शदीप सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने १० षटकांत ७० धावा देत चार फलंदाजांना बाद केले.
 
सामना संपल्यानंतर प्रसारकांशी संवाद साधताना अर्शदीपला त्याच्या विकेटनंतरच्या खास डान्स सेलिब्रेशनबाबत विचारण्यात आले. त्यावर त्याने हे सेलिब्रेशन आपल्या गर्लफ्रेंडसाठी असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होते. आम्ही जेव्हा फिरायला किंवा कुठे बाहेर जातो, तेव्हा अशाच डान्सच्या स्टेप्स करतो. आमच्यापैकी कोणाचा मूड खराब असेल, तर एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठीही आम्ही असेच करतो. त्यामुळे हे सेलिब्रेशन तिच्यासाठी खास होते."
 
आपल्या गोलंदाजीतील कामगिरीबाबत बोलतानाही अर्शदीपने प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाजांकडून काहीशी घाई झाल्याचे त्याने मान्य केले. तो म्हणाला की, आम्ही गरजेपेक्षा जास्त विकेट मिळवण्याच्या मागे लागलो. संपूर्ण डावात ज्या रणनीतीने गोलंदाजी केली, त्यावरच ठाम राहायला हवे होते. तसे केले असते, तर विकेट आपोआप मिळाल्या असत्या. मात्र, अखेरच्या टप्प्यात आम्ही काहीसे उतावीळ झालो.
 
दरम्यान, अर्शदीपने या सामन्यात आणखी एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. न्यूझीलंडच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यात चार किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे यांनी न्यूझीलंडविरुद्ध ३३ धावांत पाच विकेट्स घेत भारतीय गोलंदाजांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. जवागल श्रीनाथ, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनीही न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय सामन्यात प्रत्येकी चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. अर्शदीपच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला फायदा झाला असून, त्याच्या खास सेलिब्रेशनची चर्चा मात्र चाहत्यांमध्ये रंगली आहे.