कारंजा लाड,
vidyabharti-junior-college महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रदान करण्यात येणार्या ‘आयडॉल शिक्षिका पुरस्कारा’साठी कारंजा येथील विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रा. विभा वैभव लाहोटी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उल्लेखनीय कार्याची या निवडीच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
प्रा. विभा लाहोटी या गेल्या १५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये जिल्हा तसेच राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात वैज्ञानिक विचारांची रुजवण करण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत.केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत त्या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही सक्रिय आहेत. गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी सहकार्य करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे आणि वंचित घटकांना मदतीचा हात देणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे.
त्यांना यशस्विनी गौरव पुरस्कार, उत्कृष्ट सेवा सन्मान, शिक्षण सन्मान पुरस्कार तसेच कोरोना योद्धा पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.१५ वर्षांच्या समर्पित शैक्षणिक सेवेला आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या कार्याला मिळालेली ही पावती मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयासह कारंजा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व शुभचिंतकांनी प्रा. विभा लाहोटी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.