अग्निवीरांच्या सेवा आता चारऐवजी सहा वर्षे करता येणार देशसेवा!

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Agniveer service tenure now six years अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भरती झालेल्या अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पहिल्या तुकडीतील अग्निवीरांच्या सेवेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे निवडक अग्निवीरांना आता चार वर्षांऐवजी सहा वर्षांपर्यंत सैन्यात सेवा बजावता येणार आहे. या अतिरिक्त सेवेला 'सेकंड टूर ऑफ ड्युटी' असे नाव देण्यात आले आहे. अग्निपथ योजनेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी केली. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा सेवाकाळ २१ नोव्हेंबरला संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
 
 

Agniveer service tenure now six years 
 
 
सध्याच्या नियमानुसार, चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांपैकी २५ टक्के जवानांना नियमित सैन्यदलात कायमस्वरूपी संधी दिली जाते, तर उर्वरित ७५ टक्के जवानांना सेवेतून मुक्त केले जाते. मात्र, नव्या प्रस्तावानुसार सेवेतून मुक्त होणाऱ्या ७५ टक्के जवानांमधील ठरावीक संख्येतील उमेदवारांना आणखी दोन वर्षे सेवा करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पहिल्या तुकडीतील जवानांच्या सेवामुक्तीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. भारतीय नौदलातील अग्निवीर २१ नोव्हेंबर २०२६ रोजी, हवाई दलातील अग्निवीर २१ डिसेंबर २०२६ रोजी, तर लष्करातील पहिली तुकडी ३१ डिसेंबर २०२६ रोजी सेवामुक्त होणार आहे.
 
 
केंद्र सरकारने १४ जून २०२२ रोजी अग्निपथ योजना सुरू केली होती. या योजनेतून साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना तिन्ही सैन्यदलांमध्ये भरती केले जाते. निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांच्या सेवाकाळात दरमहा वेतन दिले जाते. सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुमारे ११ लाख ७१ हजार रुपये एकरकमी सेवा निधी मिळतो. मात्र, या योजनेत नियमित पेन्शनची तरतूद नाही. चार वर्षांनंतर २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सैन्यसेवेची संधी मिळते, तर उर्वरित जवानांना सेवा निधी देऊन मुक्त केले जाते. याशिवाय, सेवामुक्त झालेल्या जवानांना पोलीस आणि सुरक्षा दलांमधील भरती प्रक्रियेत सवलतींचाही लाभ मिळतो. आता दोन वर्षांच्या अतिरिक्त सेवेच्या पर्यायामुळे पहिल्या तुकडीतील काही अग्निवीरांना सैन्यात अधिक काळ काम करण्याची संधी मिळणार आहे.