अनिल अंबानी समूहाची ५१० कोटींची मालमत्ता जप्त

चार्टर्ड विमान आणि पवनचक्कीही ताब्यात

    दिनांक :04-Nov-2026
Total Views |
मुंबई,
anil-ambani बँक घोटाळा आणि आर्थिक अनियमिततेच्या तपासाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिलायन्स अनिल अंबानी समूहावर पुन्हा एकदा कायदेशीर पकड घट्ट केली आहे. तपास यंत्रणेने समूहाशी संबंधित कंपन्यांच्या बँक घोटाळा प्रकरणांमध्ये ५१०.१७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या कारवाईसह आतापर्यंत २३,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त आणि ताब्यात घेण्यात आली आहे.
 
 
anil-ambani
 
ईडीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांच्याशी संबंधित बँक घोटाळा प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. रिलायन्स होम फायनान्स/कमर्शियल फायनान्स प्रकरणात २६३.०५ कोटींची, तर रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) बँक फसवणूक प्रकरणात २४७.१२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत चार्टर्ड विमानांसह पवनचक्कीपासून ते औद्योगिक आणि स्थावर मालमत्तांचा समावेश आहे.
 
सार्वजनिक निधी विदेशात वळवल्याचा आरोप
तपास यंत्रणेच्या तपासात असे उघड झाले की, अनिल अंबानी ग्रुपच्या कंपन्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सार्वजनिक निधीच्या अपहारामध्ये सामील होत्या. इतकेच नाही, तर प्रवर्तकांवर दिवाळखोरी आणि नादारी संहितेचा गैरवापर करून वैयक्तिक वापरासाठी कॉर्पोरेट मालमत्ता मिळवल्याचा आणि भारतीय सार्वजनिक निधी विदेशातील टॅक्स हेवनकडे वळवल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच यातील मोठा हिस्सा प्रवर्तक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आला, असाही आराेप आहे.
 
तपासात सहा प्रमुख कंपन्यांचा समावेश
ईडीच्या तपासात मेसर्स रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड, मेसर्स रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, मेसर्स रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड, मेसर्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, मेसर्स रिलायन्स पॉवर लिमिटेड आणि मेसर्स रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या सहा कंपन्यांचा समावेश आहे.